क्षणा क्षणाला मी वेगळे पात्र असतो
कथा माझीच आहे की मी कथेत असतो (?)
किती दूर घेऊन जाते हे प्रेम मला प्रवाही
डोहात खोल एकटे मग सोडून जाते तेही
आर्त स्वरात पुन्हा मी तुलाच आवाज देतो
कथा माझीच आहे की मी कथेत असतो (?)
चिंब पावसाळी कधी जातो माळावरी
दिसते का शोधतो ती गोड हासरी परी
भासांत तुझ्याच दंग मी स्वतःशीच हसतो
कथा माझीच आहे की मी कथेत असतो (?)
आयुष्य नेते मला मृत्यूच्या कवेत
की शांत आहे हा मी तुझ्या मिठीत (?)
खेळ बुद्धीबळाचा मी एकटाच खेळत असतो
कथा माझीच आहे की मी कथेत असतो (?)