नावापुरताच उरलोय आता
बहुधा तेवढाही उरलो नाही
अमानुष ह्या मानवी खेळात
मी कुणालाच पुरलो नाही…
ठरवूनच निघालो नजर चुकवत
की पुन्हा तुम्हाला दिसणार नाही
फार आर्जवे केली वाऱ्याला पण
इथल्या हवेत काही मी विरलो नाही…
हे वेडाचे सोंग घेतले
कारण दूर पळता आले नाही
तुम्ही नमस्कार केलात मला अन्
मी वेडाही ठरलो नाही…
हरण्यासाठीच डाव मांडला
जिंकण्याची शक्यताही नाही
व्याख्याच बदलली जिंकण्याची तुम्ही
मग प्रयत्न करूनही मी हरलो नाही…