आता स्वतःचा विचार करायला पाहिजे
स्वार्थी वाटले तरी ते जमायला पाहिजे
आता पुरे झाले ते पाप-पुण्याचे बहाणे
मला स्वतःलाही जरा न्याय द्यायला पाहिजे
ओसाड उभा मी असा हिरव्या माळरानी
माझ्या मनातलाही गाव वसायला पाहिजे
नाही नाकारले मी आजवर इथे कुणा
मला माझाही स्वीकार करायलाच पाहिजे
अदृश्यच मी भर माणसांत असूनही
माझेही अस्तित्व आता दिसायला पाहिजे
पडीकच असतो मी ह्या गर्दीत इथल्या
थोडासा मलाही भाव मिळायला पाहिजे
पापे उपभोगली होती मी मागील जन्मी
ह्या जन्मीचे पुण्यही मी भोगायला पाहिजे
फुका मारतो मी गप्पा खोल आत्मज्ञानाच्या
मी खरा कोण? मलाही कळायला पाहिजे
किती वेळा मरतो तुझ्या अशा बोलण्याने
पुन्हा जन्मतो नव्याने म्हणून जगायला पाहिजे
तू प्रेम केलेस माझ्यावर निरिच्छपणे
स्वतःच्या प्रेमात मीही आता पडायला पाहिजे
स्वतःच्या प्रेमात मीही आता पडायला पाहिजे