नाही जमत बुवा आपल्याला
माळायला कवितेत जाई-जुई
म्हणून काय माझ्या कवितेला
तुम्ही कविताच म्हणणार नाही(?)
असेल शांत तलावासारखी
घुसमटून उन्हात आटणारी
चातकाच्या (खोट्या) कथा ऐकून
पावसाची वाट पाहणारी
नसेल अवखळ नदी सारखी
तिला विलीन होण्याची घाई
म्हणून काय माझ्या कवितेला
तुम्ही कविताच म्हणणार नाही(?)
असेल अल्लड वेडी वाकुडी
रान वाटांच्या वळणांसारखी
सौंदर्य हिरव्या शालुचे त्या
हळुवार घडीतून मांडणारी
नसेल माझ्या कवितेत बहुधा
प्रेम स्वरूप आई
म्हणून काय माझ्या कवितेला
तुम्ही कविताच म्हणणार नाही(?)
असतील घाटदार वळणे तिला
तिची असेल डौलदार चाल
सौंदर्याचं लेणं लेऊन
ती दाखवेल भलतीच कमाल
नसेल कदाचित कवितेत माझ्या
दुःखाने अगतिक बाई
म्हणून काय माझ्या कवितेला
तुम्ही कविताच म्हणणार नाही(?)
नसेल बांधली वृत्तात तिला मी
मुक्त छंदात मांडली
मान्यता तुम्ही देत नाही म्हणून
ती माझ्याशीही भांडली
नसतील दिसत शब्द तुम्हाला
पुसली असेल तिथली शाई
म्हणून काय माझ्या कवितेला
तुम्ही कविताच म्हणणार नाही(?)
:- प्रसन्न राऊत