मी थेंबा-थेंबानी दुःख जमवत राहिलो
पण त्याचेही तळे साचलेच नाही
मनाला झालेल्या असंख्य छिद्रांमुळे
मला एवढेही करणे जमलेच नाही
जमवाजमव मी केली खूप
जुळवून घेण्या सर्वांशी खास
फाटलेल्या माझ्या झोळीत मात्र
कोणालाही राहणे जमलेच नाही
ओढाताण झाली फार
तुझी सर्वांग झाकताना
तोकड्या माझ्या पांघरूणास तर
मलाही झाकणे जमलेच नाही
कसे मानलेस तू ह्यास घर
भकास भिंती नाही छप्पर
उघडया बोडक्या ह्या व्यथेला
संसारही म्हणणे जमलेच नाही
वाहत गेलो काळासोबत
कधी विरुद्ध पोहलोही नाही
फक्त लोकापवादाच्या भीतीने
जीवनही जगणे जमलेच नाही