माणसांची की भावनांची
वाहते ही गर्दी
गुदमरणारे श्वास आपले
पाहते ही गर्दी
मी वळून पाहता थबकुन
जागीच ते क्षणभर
माझ्याकडेच एकटक पहात
राहते ही गर्दी
चालतो मी सावध अखंड
मार्गानेच आपल्या
चोरुन हळूच माघारी मग
बोलावते ही गर्दी
हताश मी उभा इथे
हतबल अन् निश्चल
उगीच खोट्या मायेने मग
रागावते ही गर्दी
कोठे निघालास (?)
जायचे आहे तुला कोठे (?)
कानात हळूच धाकानेच पण
विचारते ही गर्दी
रस्ता कुठला (?) ध्येय काय (?)
मला ठावूक कोठे (?)
नव्हते जायचे नेमके तिथेच
फेकते ही गर्दी
रात्रंदिन मी इथे शोधतो
तुला खास आहे
चेहरे सगळे तुझ्याच सारखे
दावते ही गर्दी
कशी लपशील तू वेडे
ह्या गर्दीत इथल्या
तुला बघायलाच तर इथे
जमते ही गर्दी
अस्वस्थ कसा मी
असूनही व्यस्त कामांत इतक्या
गुपित सुखाचे एकटेपण हे
सांगते ही गर्दी
येणे जाणे नाहीच तुमचे
माझ्याकडे तसेही
तुम्हा सर्वांना न जाणो कसे
ओळखते ही गर्दी
वेगळे मी किती ठेवले
इथे स्वतःला तरी
गर्दीचाच मला भाग एक
मानते ही गर्दी!
छान कविता लिहिली आहे
गर्दी ही कविता आहे खूपच दर्दी