भागाकार करता करता बाकी मोजत होतो
आयुष्याच्या गणिताची मी किंमत शोधत होतो
बेरजेचा तर प्रश्न कधी आलाच नाही आजवर
वजा झालेल्या सगळ्याचाच हिशोब लावत होतो
गुणाकार तर माझ्या गावीही नव्हता कधी
शून्याने गुणल्यावर दिसणारा आकार बघत होतो
वर्गमुळे, घातांक वगैरे केल्या साऱ्या गणिती क्रिया
उगीच एखाद्या तज्ञ शास्त्रज्ञासारखा वागत होतो
मांडणी ह्या गणिताची केली मीच होती जरी
आज पुन्हा ह्याची उकल इतरांकडे मागत होतो