धर्म! हिंदू वेद -शास्त्रांप्रमाणे ‘धर्म’ म्हणजे जगण्याचा नैसर्गिक नियम! आणि ‘कर्म’ म्हणजे क्रिया-प्रतिक्रियेचा नैसर्गिक नियम!हे सगळं जग ह्या दोन नियमांना अनुसरुन चालते .ह्या दोन मूलभूत दैवी नियमांच्या व्यतिरीक्त सगळे नियम, कायदे कानून हे दुय्यम आहेत, मानव निर्मित आहेत असे वेद शास्त्र सांगते आणि प्रत्यक्षातही ते तसेच असावे असे मलाही वाटते.
आता तू म्हणशील हे अचानक ‘कर्म-धर्म’ अशा अत्यंत किचकट विषयानेच सुरुवात?
आज स्वारींची लक्षणे ठिक दिसत नाहित? काय झालय तरी काय? आणि ह्या वाक्यासरशी सुंदर हसशील, तुझे ते गुलाबी गाल अधिकच गुलाबी होतील, तुझे ते नाजूक ओठ मला थांबवतील, तुझे ते पाणीदार डोळे एक खट्याळपणाची झलक दाखवतील आणि तुझ्या हातंचा तो उबदार स्पर्ष! मला अंगावर वीज पडल्यासारखे वाटले क्षणभर!
पण आज मी विषय सोडणार नाही. आता म्हणशील ठिक आहे मी ऐकते….आता मीच स्वतःहून तुला पदरात पाडून घेतलय तर्….पुन्हा एक मिश्किल हास्याची लहर माझं सर्वांग रोमांचित करुन गेली.
पण; अचानक तू शांत होशील, माझा प्रत्येक शब्द जीवाच्या आकांताने ऐकण्याचा तुझा प्रयत्न आणि तो हृदयाच्या कप्प्यांत दडवून ठेवण्यासाठीची तुझी धडपड मला नेहमीच धुंद करते….एवढे प्रेम ह्या वेड्या माणसावर?आणि ह्या प्रश्नाने मला आजच्या क्लिष्ट आणि विचित्र वाटणार्या विषयावर बोलायला लावले आहे. इतके प्रेम दुसर्या एखाद्यावर केले असतेस तर त्याने तुला सोन्याच्या महालात ठेवले असते, नाहितर मी!
जाऊदे तुझ्या प्रेमाचा असा हा अपमान मला स्वतःला सहन होत नाही….माझेही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे पण….पण मी ते सिद्ध करु शकत नाही. आता तू म्हणशील “गप्प बस! हल्ली फार झालयं तुझं हे असं बोलणं, तुला माझा कंटाळा आलेला दिसतोय?” हळूच तुझ्या ओठांचा माझ्या गालाला झालेला स्पर्ष पुन्हा एकदा मला स्वप्नांत घेउन गेला….
“अगं पण मी काय म्हणत होतो….”“जाऊदे, कर्म धर्म सगळं समजलय मला ! जो तुझा धर्म तोच माझा आणि जे तुझे कर्म तेच माझं ! बस आता एकही शब्द नको, तुझ्याशिवाय सोन्याच्या महालात रहाण्यापेक्षा तुझ्यासोबत एखाद्या झोपडीत….” मी झटकन तुझ्या ओठांवर बोट ठेवले. तुझ्या शरीराचा तो नाजूक स्पर्श सर्वांग चेतवित होता, तुझ्या रेशमी केसांतून हात फिरवताना मी स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करत होतो पण पुन्हा तुझेच शब्द आठवले, काय म्हणालिस तू? “जो तुझा धर्म तोच माझा आणि जे तुझे कर्म तेच माझं” असचं ना? तू हळूवार दिलेला होकार मला समजला.
“ठिक आहे, मग ह्या विचारावर ठाम आहेस तर?” माझ्या ह्या प्रश्नाने मात्र तुला राग आल्याचे माझ्या बरगड्यांत जोरदार लागलेल्या तुझ्या त्या कोपराने सिद्ध केले. उत्तर मिळाले म्हणून पुढे विषयाला हात घातला.
“मग धर्म म्हणतो की ‘कर्म करावे फळाची अपेक्षा करु नये’ आणि कर्म म्हणते ‘जैसे तुमचे कर्म असावे तैसे फळ निश्चयी मिळावे’.” तू म्हणालीस, “ठिक आहे, त्यात काय चुकले? योग्यच तर आहे!”
“पण तुला त्यातला एक गूढ अर्थ माहित आहे काय?”ह्याचा एक अर्थ, नुसता अर्थ नाही तर गर्भितार्थ असा आहे की प्रत्येक गोष्ट मिळ्वण्यासाठी इथे प्रत्येकाला काही ना काही किंमत मोजावीच लागते….तू म्हणशील, “हे मला माहित आहे आणि ते त्रिकालाबाधित सत्य आहे; कोणत्याही गोष्टीची योग्य किंमत दिल्याशिवाय ती मिळवता येत नाही….”
मी तुला किंचित दूर सारून तुझ्या डोळ्यांत पहात विचारले, “म्हणजे तुला कर्म आणि धर्म दोन्हींचा अर्थ समजला तर!” तुझ्या हाताच्या बोटंनी ह्ळूवारपणे माझ्या बोटांना दिलेले उत्तर कळले मला!
“मग आता तुझ्या त्या बोलण्याचा विचार कर.” मी नाजूक स्वरांत पण खंबीरपणे तुला विचारले. तुझ्या चेहर्याची ती हळूवार हालचाल मला वाचता आली नाही असे नाही पण आज मला शब्द हवेत्….तुझ्या चेहर्यावरची ती भीतीची रेषा मला अचानक गारठवून गेली!
“काय म्हणायचे तरी काय आहे तुला?” तुझ्या गोड पण करारी आवाजाने शांतता भंग झाली, तुझ्या भावनेने पाणावलेल्या डोळ्यांनी पुन्हा तोच प्रश्न केला.
“मी….मी म्हणत होतो….”“तुला असेच म्हणायचे आहे ना की मला तुला मिळवण्यासाठी आणि तुला मला मिळ्वण्यासाठी देखिल अशीच किंमत मोजावी लागणार! हा समाज, स्वत:ला सर्वोच्च जीव समजणारी ही संपूर्ण मानवजात आपल्याकडून काहितरी किंमत वसूल करणार….आपल्या प्रेमाची किंमत! ठरवणारही तेच! आणि घेणारही तेच!
पण एक सांगते तुझ्यासाठी मी कितीही मोठी किंमत मोजायला तयार आहे, आणि हे माझे आंधळे प्रेम नाही किंवा नुसता खोटा प्रेमालाप नाही तर हे माझ्या जीवनाचे सौंदर्य आहे, माझ्या जगण्याचे कारण आहे. तुच माझा धर्म आणि तुच माझे कर्म….”तुझे एवढे स्पष्ट बोलणे मी या आधी कधिच ऐकले नव्हते….तुझे ते पाणावलेले डोळे मला अधिकच भावनाविश करुन गेले.
“मी ….मी असं नव्हतो….तुझ्यापुढे इतर गोष्टींची किंमत ती काय? पण…..”तुझ्या नजरेनेच मला न थांबण्याचा आदेश आणि पुढे बोलण्याची हिम्मत दिली.मी म्हणत होतो, कधीतरी आपापल्या आयुष्यातील उरलेली, बाळगलेली, खास जोपासलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला अशा अनेक गोष्टींच्या किंमती मोजाव्या लागतील….”
“ठिक आहे, समाधानाचा फायदा लक्षात घेउन तो-तो व्यवहार पार पाडू.” तुझे उत्तर अगदी योग्य होते, व्यवहार्य होते पण…”बोल ना, संपला का विषय?” “नाही! पण आयुष्यात अत्त्युच्च म्हणून ठरवलेल्या धेय्यापाशी पोहोचल्यावर….प्लीज रागावू नकोस्….त्याच्या प्राप्तीसाठी समजा तुला माझी किंवा मला तुझीच किंमत मोजावी लागली तर?”
प्रश्नासरशीच वातावरण गरम झालयं असं वाटू लागलं. उन्हाचा चटका असहाय्य झाला होता, वाटलं तुला घट्ट मिठीत घ्यावं आणि तुझ्या त्या विशाल कपाळाचे एक भावपूर्ण चुंबन घ्यावं, तसं करण्यासाठी बाजूला हात नेला आणि बघतो तर…तू नाहिस!
सगळं जग शोधलं आजही तू मिळाली नाहिस….असाचं रोज मी घराबाहेर पडतो, तुझा शोध घेत वेड्यासारखा भटकतो…हजारो चेहर्यांत तुझा तो हसरा चेहरा शोधतो….पण नाही!
त्या वेळी मला पडलेल्या त्या प्रश्नाच्या उत्तराची ती किंमत आहे. तू उत्तर दिलस आणि त्यासाठीची किंमतही पुरेपुर वसूल केलिस….
का गेलिस अशी अर्ध्या वाटेवरच सोडून मला?
तुला शेवटचे पाहिले ते तुझ्या घरातिल तसबिरीतच!
पुन्हा तू काही भेटली नाहिस….माझा शोधही संपला नाही….आणि तो प्रश्नही उरला नाही….खरं सांगायचे तर तुझ्याविना माझ्या आयुष्याला काही किंमतच उरलेली नाही….