कविता कोणी करावी?
कविता शिकलेल्याने करावी
कविता न शिकलेल्याने करावी
कविता अनुभवी वृद्धाने करावी
कविता अजाण बालकानेही करावी
कविता शहाण्याने करावी
आणि वेड्याने तर करावीच करावी
कविता करायला जमणाऱ्याने करावी
आणि न जमणाऱ्याने तर नक्कीच करावी
पण प्रत्येकाने आयुष्यात
एक तरी कविता जरूर करावी
कविता कशी करावी?
कविता अशी करावी
आणि कविता तशीही करावी
कवितेला नको यमकाचा नियम
कवितेला नाही वृत्ताचे बंधन
कवितेला गेयता असावीच असे नाही
कवितेेेला गेयता नसावी असेेेही नाही
कवितेला नसते अर्थाची सक्ती
कवितेला नाही कशाचीच आसक्ती
जमलीच तर एखाद्या छन्दात करावी
नाहीच तर मुक्त छन्दात करावी
पण प्रत्येकाने आयुष्यात
एक तरी कविता जरूर करावी
कविता कशावर करावी?
कविता सुखावर करावी
कविता दुःखावरही करावी
कविता जगण्यावर करावी
कविता मरण्यावरही करावी
कविता चैत्रावर करावी
कविता वैशाखावर करावी
कविता वैशाखातल्या वणव्यावर करावी
कविता फाल्गुनातल्या होळीवरही करावी
कविता आईच्या प्रेमावर करावी
कविता बापाने दिलेल्या मारावर करावी
कविता प्रेेेयसीच्या नाजुुुक स्पर्शावर करावी
कविता प्रियकराच्या विरहावर करावी
कविता भुकेलेल्या पोटावर करावी
कविता तृप्तीच्या ढेकरावर करावी
कविता ह्या निसर्गावर करावी
कविता सर्व जगावर करावी
कविता कोऱ्या कागदावर करावी
आणि जमलेच तर खुद्द कवितेवरही करावी
पण प्रत्येकाने आयुष्यात
एक तरी कविता जरूर करावी
कविता कोणावर करावी?
कविता आवडत्या व्यक्तीवर करावी
आणि नावडत्या व्यक्तीवर तर आवर्जून करावी
कविता अस्तित्वात असलेल्यांवर करावी
आणि कविता अस्तित्वात नसलेल्यांवरही करावी
कविता इतरांवर करावी
जमलीच तर स्वतःवरही करावी
पण प्रत्येकाने आयुष्यात
एक तरी कविता जरूर करावी
आता मात्र कहरच झाला
तुमचा पुढचा प्रश्न आला
‘तू कविता का आणि कोणासाठी करतो?’
सांगणे तसे कठीणच आहे
पण गैरसमज नको म्हणून सांगतो
मी कविता करतो तिच्यासाठी
आणि मी कविता करतो त्याच्यासाठी
मी कविता करतो माझ्यासाठी
आणि असा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकासाठी
मी कविता करतो होण्यासाठी व्यक्त
मी कविता करतो होण्यासाठी माझ्याच बंधनातून मुक्त!