राहिले मागे तुझे ते घेऊन जा एकदा
तेवढ्यासाठी तरी तू येऊन जा एकदा
हा असाह्य भार असा तुझ्या गोड आठवांचा
हात तुझा खांद्यावरी ठेवून जा एकदा
गोंजारले जपले तुला मी जीवापाड होते
का गेलास सोडून ते सांगून जा एकदा
आहे रिकामी झोपडी ही माझी गरिबीची
पुन्हा जरा माझ्या घरी राहून जा एकदा
नातवाचे बोल बोबडे पुन्हा ओढ लावती
सुख हळव्या स्पर्शाचे देऊन जा एकदा
आई आहे म्हणून एवढी तळमळ होते
म्हातारी आहे कशी ते पाहून जा एकदा
ते तेथे कोपऱ्यात त्या शुद्ध गंगाजल आहे
थेंब त्याचे ओठांवरी घालून जा एकदा
ठेवेल ती सुखाने संसार राजा राणीचा
ह्या संसारातून मला सोडवून जा एकदा…