बर्याच दिवसांनी …नव्हे वर्षांनंतर आज निवांत संध्याकाळी मिळाली म्हणून पुन्हा या शांत समुद्र किनाऱ्यावर येऊन बसलो.
शांत समुद्रकिनारा! स्वतःमध्येच विरोधाभास… असो आज ठरवूनच आलो आहे… हे मनातले वादळ शांत झाल्याशिवाय… अहं…केल्याशिवाय जायचे नाही इथून…
कित्येक वर्षे गेली. तारूण्य सरले. आयुष्याची सोनेरी संध्याकाळ होत चालली आहे… हो सोनेरी संध्याकाळ!
काही जवळची माणसे फार फार दूर निघून गेलीत एव्हाना, तर काही माणसे अनायासे जवळ आली. कोणी माझ्यात गुंतले आणि आणि मी तुझ्यात!
…लग्न, मुलं, त्यांचं बालपण, त्यांचं मोठं होणं, हे सगळं सगळ्यांबरोबर होतं ना तसेच माझ्याबरोबर ही झालं आणि हो मी ते सगळे व्यवस्थित आणि समाधानाने जगलोही आजपर्यंत!
काही सोबतीच्या शपथा घेऊन दूर गेले… त्याची खंत नाही! आणि जे शब्दात कधीही न सांगता साथ देत गेले त्यांना आता गमावण्याची भीती नाही… या सर्वांच्या पलीकडे कधी पोहोचलो ते कळलेच नाही.
पण …पण बऱ्याच वर्षानंतर आज पुन्हा तू आठवलीस! …आठवलीस म्हणणे योग्य ठरणार नाही, विसरलो होतोच कुठे तुला ? एखाद्या आडवळणावर पायवाटा एकत्र याव्यात अशी आपली ओळख!
एकत्र भेटणाऱ्या त्या पायवाटा आपापल्या वाटेने दूर जाणारच असतात एकमेकांपासून, हे वास्तव माहीत असूनही त्यांना त्या भेटीची आणि एकमेकात गुंतण्याची भीती वाटत नाही ना तसेच काहीसे झाले आपले!
तेव्हा वय लहान होते अनुभवही कमी होता, पण समज कमी होती असे मी म्हणणार नाही. त्या समजेतुनच नाव न देता येण्याजोगे नाते तयार होत गेले परंतु गुंता झाला नाही.
…ह्या सगळ्यातच वेळ कसा गेला समजलेच नाही. आपापली कर्तव्ये जबाबदाऱ्या पार पाडताना ना तुला कधी माझी गरज वाटली ना मला कधी तुझी! पण त्यात चुकिचे असे काहीच नव्हते कारण उघडपणे गरज वाटली नाही आली तरी अंतर्मनाची साद ऐकू येत होतीच कधीतरी!
खरं सांगायचं तर तुझ्या सोबतचा आयुष्याच्या पायवाटेवरचा तो छोटासा एकत्र प्रवासही मी मनापासून जगलो… आता खंत म्हणशील तर एवढिच आहे, की तुला कधीही विचारलं नाही की तू त्यावेळी समाधानी होतीस का ते?
पण… जाऊदे सगळ्याच गोष्टी शब्दात सांगण्याजोगे ते नाते नव्हतेच आपले कधी आणि तशा अपेक्षाही नव्हत्या ही जमेची बाजू म्हणायची!
पण आजही तोच प्रश्न पडतो, असे का घडले ? अशा प्रकारचे नाते अनुभवण्याची संधी आयुष्याने का दिली ? की खरंच पूर्वजन्मीचे काही ऋणानुबंध होते?
उत्तरे शोधण्याचा निष्फळ प्रयत्न आजही करतोच आहे. सापडतील असे नाही, पण शोधण्यातली गंमत ह्या वयातही अंगावर रोमांच उभे करते म्हणून शोधत आहे.
ही सोनेरी संध्याकाळ लवकरच काळ रात्रीचे ते मोहक रुप धारण करील आणि मला स्वतःमध्ये सामावून घेईल त्या शेवटच्या क्षणी समोरून आयुष्याची क्षणचित्रे झरझर सरकतील तेव्हाही मी तुझ्या चित्रासमोर क्षणभर थांबेनच !
पुढचा जन्म घेण्याची इच्छा झालीच तर पुन्हा अवतरेन… या जन्मीचे ते राहिलेले पूर्ण करण्यासाठी !
फक्त तुझ्यासाठी!