अंधारल्या त्या कोनाड्यात मी एकटाच झुरत होतो
तरी इथल्या दुःखांना मी पुरुनही उरत होतो
कोणी म्हणती सूर्य मला अंधारवाटा उजळणारा
कसे कळावे तुम्हाला मी अंतरबाह्य जळत होतो
दुरूनच फिरता तुम्ही सारे माझ्या मायेच्या उबेत
जवळ येणाऱ्या प्रत्येकाला मी नकळतच जाळत होतो
अंधारावर मात केली पेटवून मी सर्वस्व माझे
स्वतःच्या प्रकाशात तरी काळोखच बाजूचा उगाळत होतो
उगवताना गर्व केला मानले न मी तुमचे काही
मावळतांना आता मात्र मी स्वतःलाच टाळत होतो