मन सोसाट्याच्या वाऱ्याचे,
की लुकलूकणाऱ्या ताऱ्याचे?
अवखळ वाहत्या झऱ्याचे,
की आरशाच्या पाऱ्याचे?
मन आहे नक्की कशाचे?
मन आहे नक्की कुणाचे?
मन माझे म्हणता माझे नाही
मन तुझे म्हणता मान्य नाही
मन सौम्य म्हणता दुखत नाही
मन कठोर करता दुखत राही
मन पाहू जाता दिसत नाही
मन लपवू पाहता उघड होई
मन तिजोरी जर स्वप्नांची
तर लुटताही येत नाही
मन फडताळ जर आठवणींचे
तर कुलूपबंद ही होत नाही
मन व्यथा प्रत्येक मनाची
समजू पाहता समजत नाही
मन स्वतःच्याच शोधात मग
पुन्हा मनातच हरवून जाई…