काय बिनसलंय तिचं नी माझं
तेच कळत नाही
कळत नाही म्हणण्यापेक्षा
तेच आठवत नाही
हो आठवत नाही म्हणतोय कारण
मामला जन्मोजन्मीचा आहे…
तिच्या माझ्या नात्याला ह्या निनावी
खूपच खोल गूढ अर्थ आहे…
कुठल्या जन्मी माझ्याकडून
काय चूक अशी झाली ?
की ती पुढल्या प्रत्येक जन्मी
जरा उशिरानेच आली!
ह्या जन्मी ही, भेटली पुन्हा
पण वेळ निघून गेल्यावर
पुन्हा पुढच्या जन्मीचे वचन
घेऊन गेली शपथेवर
तिचीच माफी मागून लाडेच
विनवणी करतो पुन्हा
पुढल्या जन्मी तरी प्रिय सखे
माफ करशील का माझा गुन्हा?
तिच्या साठीच रचतो ह्या
कविता साऱ्या आजवर
तिने वाचून म्हणावे एकदा
थांब जरा तू क्षणभर
मी येतेच पुन्हा तुझ्याकडे
तुझीच होणार आहे
ह्या वेळेस मात्र मी
नक्की वेळेवरच येणार आहे…