अडगळीच्या खोलीतून त्या
मी ती आठवण बाहेर काढली
बरेच दिवस फडताळात बंद असलेली
एक वही बाहेर काढली
उघडली असतील पाने
जेमतेम पहिली पाचच
अचानक त्यातून त्या फुलाची
सुकलेली पाकळी बाहेर पडली…
घेतली हातात हलकेच ती
अजून सुवास तसाच होता
रंग उडाला पुरता तरी अजूनही
तिच्यात आपल्या प्रेमाचा वास होता
घेतला मी एक दीर्घ श्वास
भरून घेतला माझ्यात तो वास
म्हटले स्वतःशीच आता जमेल नक्की
करायला सहज पुढचा प्रवास…
बरे वाटले, भानावरही आलो
पुन्हा झालो सज्ज, पुढे निघालो
कुठेतरी पैंजणांचा आवाज झाला
पुन्हा तुझ्या असण्याचा भास झाला
दचकून चोहीकडे फिरून पाहिले
तू इथे कशी? स्वतःलाच विचारले
त्या वहीची पुढची पाने उलटली
तुझ्या ओल्या मेहेंदिची नक्षी दिसली
तिथली अक्षरं नीट दिसतच नव्हती
मेहेंदीच्या आडून लपून पाहत होती
हातानेच वाचायचा प्रयत्न केला
स्पर्शातूनच अर्थ कळतो का पाहिला
आज कळले ते तेव्हा तुझे असे जाणे
पुन्हा फिरून माघारी कधीही न बघणे
तुझे असे नव्हतेच त्यात खरे काही
तुझी साथ माझ्या नशीबातच नाही
रागातच मग केली ती वही बंद
म्हटले नकोच आता तो कवितांचा छ्न्द
तूच लाविले होतेस मला वेड ज्याचे
बनून बसलेत आता त्याचेच बंध
वाटले वही ती टाकावी फाडून
तुझी आठवणही टाकावी गाडून
उचलली वही ती मी छातीशी कवटाळली
पुन्हा ती आठवण मी त्या फडताळातच कोंडली….